Sunday, January 11, 2009

दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)

नमस्कार मंडळी,
रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधल्या मला आवडणार्‍या एका कवितेचा स्वैर अनुवाद करत आहे.
कवितेचे नाव मला माहित नाही. बहुधा कवितेला स्वतंत्र नावंच नसावे. मी माझ्या समजूतीने एक नाव दिले आहे.

निर्मनुष्य नदीच्या काठी उंच गवतातून जाणार्‍या तिला मी विचारले,
' मुली, पदराआड दिवा झाकून तू कुठे बरं चालली आहेस?'
माझं घर अगदीच काळोखे आणि एकाकी आहे, तुझा दिवा मलादेतेस का?
क्षणभर काळेभोर डोळे रोखून तिने त्या धूसर प्रकाशात माझ्याकडे पाहिले
आणि म्हणाली, ' मी नदीवर आले आहे ती दिवस मावळताना हा दिवा नदीत सोडून देण्यासाठी'
उंच गवतात स्तब्ध राहून मी पाहिली ती थरथरणारी लहानशी ज्योत
वाहून गेली प्रवाहासोबत कुणालाच उपयोगी न पडता.

रात्र दाटून येताना निरव शांततेत मी तिला विचारले,
'मुली, तुझे घर तर प्रकाशाने न्हाऊन निघाले आहे, मग हा दिवा घेऊन तू कुठे निघालीस?'
'माझे घर तर अगदीच काळोखात आणि एकाकी आहे, तुझा दिवा मला दे.'
रोखून माझ्याकडे पाहत ती क्षणभर आवंकली, ' मी आले आहे,' ती शेवटी म्हणाली,
'आकाशाला दिवा अर्पण करण्यासाठी.'
मी पाहत राहिलो जळून जाणारी ज्योत त्या शून्य पोकळीत कुणालाच उपयोगी न पडता.

आवसेच्या गूढ रात्री मी तीला विचारले, 'मुली, हृदयापाशी दिवा धरून तू कशाचा शोध घेत आहेस?
माझे घर तर अगदीच काळोखे आणि एकाकी आहे. तुझा दिवा मला देतेस?'
ती जरा थांबली आणि विचार करत माझ्याकडे पाहून म्हणाली,
' मी हा दिवा आणला आहे दीपमाळेत ठेवण्यासाठी'
मी स्तब्ध राहून पाहिले तो दिवा इतर दिव्यांत हरवून गेलेला, कुणालाच उपयोगी न पडता.


मूळ कविता
On the slope of the desolate river among tall grasses I asked her,
'Maiden, where do you go shading your lamp with your mantle?
My house is all dark and lonesome--lend me your light!'
she raised her dark eyes for a moment and looked at my face through the dusk.
'I have come to the river,' she said, 'to float my lamp on the stream
when the daylight wanes in the west.'
I stood alone among tall grasses and watched the timid flame of her lamp
uselessly drifting in the tide.

In the silence of gathering night I asked her, 'Maiden, your
lights are all lit--then where do you go with your lamp? My
house is all dark and lonesome--lend me your light.' She raised
her dark eyes on my face and stood for a moment doubtful. 'I
have come,' she said at last, 'to dedicate my lamp to the sky.'
I stood and watched her light uselessly burning in the void.

In the moonless gloom of midnight I ask her, 'Maiden, what is
your quest, holding the lamp near your heart? My house is all
dark and lonesome--lend me your light.' She stopped for a minute
and thought and gazed at my face in the dark. 'I have brought my
light,' she said, 'to join the carnival of lamps.' I stood and
watched her little lamp uselessly lost among lights.


ही कविता मला अनेक वर्षांपासून आवडणारी आहे. कविता वाचताना मला असे जाणवते की अनेक रुढी-परंपरा या गतानुगतीकासारख्या पाळल्या जातात. दरिद्रीनारायणाची सेवा हीच ईश्वरसेवा आहे हे विसरून, माहित नसलेल्या आणि दिसत नसलेल्या देवाला खूष करण्यासाठी आपण खटपट करतो आणि त्या खटपटीचा बहुधा कुणालाच उपयोग होत नाही.

'दिव्याभोवती अंधार' हे नाव देण्याचे कारण असे की दिव्याच्या जळण्याने अंधार दूर होतच नाहीये. अंधार दूर करण्यासाठी दिवा जाळतात पण इथे अंधारच त्या दिव्याला वेढून टाकतोय आणि दिव्याच्या जळण्याचा उपयोगच होत नाहीये.

ही कविता आणि त्यावरील प्रतिक्रिया आपल्याला मिसपाव या संकेतस्थळावर येथे वाचता येईल.

Thursday, January 1, 2009

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

नमस्कार,
लहानपणापासूनच आपण परोपकाराय पुण्याय वगैरे ऐकत आलेलो असतो. अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धादुसर्याला मदत करुन मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मुलांच्या कथा आपल्यावर संस्कार व्हावा म्हणूनदिलेल्या असतात. त्यामुळे दुसर्याला मदत करायची असते हे कुणी मुद्दामहुन शिकवण्याची गरज असते असेमला तरी कधी वाटले नसते. पण एक प्रसंग अचानक घडला की ज्यामुळे मला शिकवण आणि प्रत्यक्ष कृतीयात काय फरक असतो ते समजले.

मी शाळकरी असतानाचा प्रसंग आहे. अगदी लहान नव्हतो. दहावीत वगैरे असेन. गणपती उत्सवाच्या वेळीआम्ही काही मित्र गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो. सोबत तीन-चार वर्षे वयांत अंतर असलेले आम्ही चौघेपाच मित्र होतो. मजा करत, हास्य विनोद करत आम्ही चाललो होतो. तेव्हढ्यात आम्हाला दिसले की पदपथावरएक अपंगाच्या चाकाच्या गाडीमध्ये मध्यमवयीन माणूस बसला आहे आणि तो इतरांकडे काही मदतीच्याअपेक्षेने पाहतो आहे. त्याने आम्हा मुलांना बोलावले आणि त्याची गाडी ढकलून थोडे अंतर चढ पार करुनद्यायला सांगितले.

त्याचे ते अतिशय ओंगळ रुप, अत्यंत मळलेले फाटके आणि एकावर एक चढवलेले कपडे आणि रोगट त्वचाअंगावर काटा आणत होती. आजवर झालेल्या पुस्तकी संस्कारांनी डोके वर काढले पण कृती करायला मनधजेना. तेव्हड्यात आमच्यातला एक जण उत्साहाने पुढे आला आणि त्याने त्या माणसाला ढकलत पुढे नेऊनसोडले. हे सर्व इतक्या जलद गतीने झाले की मी मनामध्ये एकदम खजील झालो. वास्तविक मी ती गाडीढकलायला तयार नाही हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाच समजले नाही करण माझ्या मनातली उलघाल सुरु होतअसतानाच माझा मित्र पुढे झाला सुद्धा होता.

अश्या ओंगळ किंवा किळस उत्पन्न करणार्या पण असहाय्य व्यक्तींबद्दल आपल्या मनात सहानुभूती असते. त्यांना मदत करावी असे ही समाजातला एक चांगला घटक म्हणून आपल्याला वाटत असते. पण सार्वजनिकठिकाणी अशी वेळ आल्यावर माणसे चटकन तो प्रसंग टाळायला पाहतात असे मला निरिक्षणातून जाणवलेआहे.

असे का व्हावे असा विचार आता करताना वाटले की अश्या वेळी अश्या माणसासोबत काही क्षण सुद्धा आपणआहोत ही भावना आपल्याला सहन होत नाही. पण पोक्त माणसे या भावनेवर विजय मिळवून कृती करतात.
‍ ‍ ‍
हा लेख आपल्याला मिसळपाववर सुद्धा वाचता येइल.

Wednesday, December 31, 2008

नीरव पावले (अनुवाद-गीतांजली)

नमस्कार,
रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली काव्यसंग्रहातील एका गीताचा स्वैर अनुवाद करायचा प्रयत्न करत आहे.


नीरव पावले
तुम्ही ऐकली नाहित का त्याची नीरव पावले?
तो येतो, येतो, नेहमीच येतो

प्रत्येक क्षणी प्रत्येक काळी
प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री
तो येतो, येतो, नेहमीच येतो

गायली आहेत मी अनेक गाणी मनाच्या विविध स्थितींमध्ये,
परंतु त्यांच्या सुरावटीने नेहमी हेच उद्घोषित केले,
'तो येतो, येतो, नेहमीच येतो'

स्वच्छ सुगंधी वसंतात रानवाटांनी तो येतो
येतो, नेहमीच येतो

आणि पावसाळी गूढ रात्री गडगडाटी ढगांच्या रथातून लखलखत,
तो येतो, येतो, नेहमीच येतो

दु:खाने विद्ध माझ्या काळजावर त्याचीच पावले उमटतात,
आणि त्याच्याच चरणाच्या परीसस्पर्शाने माझा आनंद उजळुन निघतो.मूळ कविता :
Silent Steps

Have you not heard his silent steps?

He comes, comes, ever comes.

Every moment and every age,

every day and every night he comes, comes, ever comes.

Many a song have I sung in many a mood of mind,

but all their notes have always proclaimed,

`He comes, comes, ever comes.'

In the fragrant days of sunny April through the forest path he comes,

comes, ever comes.

In the rainy gloom of July nights on the thundering chariot of clouds

he comes, comes, ever comes.

In sorrow after sorrow it is his steps that press upon my heart,

and it is the golden touch of his feet that makes my joy to shine.

Tuesday, December 23, 2008

मेजवानी आणि अनुवादित पुस्तके

नमस्कार,
परदेशात आल्यावर अचानक निरनिराळ्या देशांतले लोक एकदम भेटायला लागले आहेत. सर्व काळभारतातल्या एकाच गावात काढलेल्या माझ्यासारख्याला हा अनुभव फारच मजेदार वाटतो. मागच्या रवीवारीसायंकाळी आमच्या प्राध्यापकांनी त्यांच्या घरी मेजवानीस बोलावले होते. प्राध्यापकांच्या 'कार्यचमु' मधीलआम्ही सर्व दहा पंधरा जण त्यांच्या घरी जमणार होतो.

ते स्वतः आणि त्यांच्या शास्त्रज्ञ पत्नी हे दोघेही अतिशय हौशी आणि अगत्यशील आहेत. इंग्लंडमध्ये अनेक वर्षेराहिलेले असल्याने त्यांना अनेक भारतीय लोक आणि भारतीय पदार्थ माहीत आहेत. मला मेजवानीचे आमंत्रणदेतानाच त्यांनी मला सांगितले होते की त्यांच्या पत्नी या वेळेस भारतीय 'करी' आणि 'दाल' बनवणार आहेत. आणि मला त्यासाठी आवर्जून मेजवानीला यायचा आग्रह केला होता. मेजवानी म्हटले की मी सुद्धा आनंदानेचजातो. कारण अशाच वेळी वेगवेगळ्या स्थानिक पदार्थांची ओळख होते आणि या लोकांच्या पद्धती सुद्धा माहितीहोतात.

तर मंडळी, जेवणाचा बेत सुंदरच होता. चांगली 'दाल', म्हणजे आपण 'तडका दाल' अथवा 'दालफ्राय' खातो नातशीच. त्यांनी मला सांगितले की त्यात आले, लसूण, धने, जिरे, मोहरी, मिरची इत्यादी घालून फोडणी देऊनदाल' बनवली आहे. आणि 'इंडियन करी' म्हणून एक मिश्र-रसभाजी केली होती. ती सुद्धा चवीला छानच. बाकीसामिष पदार्थ प्राध्यापकांनी बनवला होता पण मी त्याकडे फिरकलोच नाही. डावीकडे घ्यायला आंब्याचे लोणचे, आंब्याची चटणी, लिंबाचे लोणचे असे पदार्थ सुद्धा खास इंग्लंडहून आणले होते. जेवण चांगलेच झाले.

तेव्हाच नव्याने रुजू झालेल्या काही लोकांशी ओळखी झाल्या. आधीच भारतीय, जर्मन, इंग्लिश, ब्राझीलीय, डच, दक्षिणआफ्रिकन असे आम्ही लोक होतोच, त्यात स्पेन मधून आलेल्या एका मुलीची आणि पोलंडहूनआलेल्या अजून एकीची भर पडली. चला, जर्मन लोक एका गटात आणि दुसरीकडे इंग्रजी बोलणारे आणि जर्मन येणारे असे मी, डच, इंग्लिश अशांच्या गप्पा सुरू झाल्या. स्पॅनिश मुलीला आणि पोलीश मुलीला पोर्तुगीजयेत असल्याने ब्राझीलीय आणि ते लोक एकत्र आले. त्यात एकीचा नवरा रशियन होता आणि त्याला पोर्तुगीजथोडीफार येत होते. पण तो रशियन आहे म्हटल्यावर मला त्याच्याशी बोलण्याची फारच इच्छा झाली.

मी आधी हसून पाहिले. त्याने पण स्मितहास्य केले. मग तेथे जवळच बुद्धिबळाचा पट आणि सोंगट्यामांडलेल्या होत्या. मी त्याला विचारले की तुला खेळता येते का? त्यावर तो नुसताच पाहत राहिला. मग मीखुणांनी विचारल्यावर त्याने "थोडेफार" असे खुणेनेच सांगितले. आमचे ते मजेदार संवाद पाहून त्याची बायकोआली. तेंव्हा समजले की त्याला इंग्रजीचा गंध नाही. मग दोन पंतप्रधान दुभाषाला घेऊन बोलतात ना, तसाआमचा संवाद त्याच्या बायकोच्या मदतीने सुरू झाला.

मी त्याला म्हटले की मी मॅग्झीम गॉर्कीच्या आत्मचरित्राचा एक भाग वाचला आहे. तो माझ्या भाषेत अनुवादीतआहे. 'बाळपण' या नावाने. त्याला फारच आश्चर्य वाटले आणि बरे ही वाटले. मग त्याला लहानपणी पारायणकेलेल्या रशियन लोककथांतील बाबायागा वगैरे मंडळीबद्दल सांगितले. या अनुवादीत पुस्तकांच्या कृपेनेआमच्या गप्पा रंगल्या. आणि माझी घरापर्यंत जायची सोयही त्यांनी केली.

यावरून मला प्रथमच अनुवादीत पुस्तकांचा खरा फायदा अनुभवायला मिळाला. लहानपणी वाचलेले, गॉर्कीचेचिमण्या', 'बालपण', कॉनरॅड रिक्टर चे जी एंनी अनुवादिलेले 'रान', 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' अशासारख्या अनेक पुस्तकांनी आणि 'अरबी अद्भुत सुरस आणि चमत्कारिक कथा', गझला, झेन कथा, हायकू, अशा अनेक अनेक साहित्यातून आपल्याला पालीकडच्या संस्कृतीची ओळख होते. त्यांचे रिवाज, मान्यतासमजतात. अनुवादित साहित्याचा हेतू यातूनच सफळ होतो असे वाटले. सांस्कृतिक देवाण-घेवाणीची ही फारचचांगली सोय आपल्याला उपलब्ध आहे असे यावेळी जाणवले. ज्यांनी असे परभाषेतले साहित्य मराठीत आणलेत्या सर्वांचेच ऋण मानावे तेवढे थोडेच आहे.
' '

हा लेख मनोगतावर इथे वाचता येईल.

Monday, December 22, 2008

प्लासिबो - समाधान

प्लासिबो विषयी विचार करता मनात जे आले ते लिहित आहे. आपण अनेकदा प्लासिबो हा शब्द ऐकला आहे. वैद्यकशास्त्रात रुग्णाला औषधी गुणधर्म असलेला पदार्थ न देता जेव्हा औषध नसलेला पदार्थ त्याचे समाधान व्हावे म्हणुन देतात तेव्हा त्याला प्लासिबो म्हणतात. रुग्णाचे समाधान करणे हाच त्याचा हेतू असतो आणि बरे होण्याची मनात इच्छा असलेला रुग्ण ते 'फसवे औषध' घेउन बरा सुद्धा होत असतो.

माझी आजी म्हातारपणाने थकली होती. तिला सारखे काहीतरी होत आहे असे वाटून डॉरक्टकडे जायचे असायचे. मग अनेकदा आमचे नेहमीचे डॉक्टर गंभीर चेहर्‍याने तिला कोणत्यातरी साध्या गोळ्या देत आणि 'जास्त त्रास झाला तर दवाखान्यात भरतीकरुन सलाईन लावावे लागेल' असे सांगत. मग पुढे काही दिवस तिला एकदम बरे असे आणि डॉक्टर किती हुषार आहेत ते आम्ही ऐकत असू ! खरेतर प्लासिबो प्रकार माहित नसताना सुद्धा आपण अनेकदा तो वापरत असतो. लहान मुल पडले तर त्याला 'आला मंतर कोला मंतर, कोल्ह्याची आई कांदे खाई, बाळाचा बाऊ उडुन जाई ।' हा मंत्र घालून त्याला बरे वाटते.

शब्द सूक्ष्म असतात. शब्दापेक्षा कृतीवर किंवा वस्तूवर आपला जास्त विश्वास बसतो. नुसते लग्न झाले असे म्हणालो तर मनावर ठसत नाही. आंगठ्यांची देवाण घेवाण, मंगळसूत्र, वरमाला यामुळे मनावर ते ठसते. देवाला नुसता नमस्कार करुन भागत नाही. अंगारा लावला, प्रसाद खाल्ला की मनावर देवाच्या दर्शनाचा संस्कार ठसतो. मला वाटते की कृती अथवा स्थूलावरचा विषास हेच प्लासिबोचे तत्व आहे.

मागे एकदा एका संताच्या चरित्रात एक प्रसंग वाचला होता. कुणालातरी बरे नाही म्हणून एक माणूस औषध मागण्यासाठी त्या संताकडे येतो. संत म्हणतो की वाटेल बरे त्यांना. पण आलेला मनुष्य नुसताच उभा राहतो. मग तो संत शेजारच्या दिव्यातल्या तेलाचे चार थेंब हातावर देतो आणि सांगतो की हे आजार्‍याच्या तोंडात सोडा त्यांना बरे वाटेल. तो मनुष्य समाधानाने परततो. हे स्थूल वस्तूचे महात्म्य. एका मराठी संताच्या चरित्रात अशीच एक घटना आहे. कुणी व्यक्ती काशी यात्रेला निघते आणि त्यांना मुळव्याधीचा बराच त्रास होऊ लागतो. ती व्यक्ती या संताला म्हणते की यात्रा संपेपर्यंत तरी काही उपाय करा. यावर तो संत शेजारच्या तुळशीची चार पाने देउन ती वस्त्राला बांधून ठेवा असे सांगतो. पुढे काशी यात्रेत त्या व्यक्तीला फारसा त्रास होत नाही. याबद्दल त्या संताला विचारता तो म्हणतो 'अहो, सूर्याचे पिल्लू ते झाकून किती लपणार !'. पहा पण नुसती पाने जवळ ठेवण्याने त्या यात्रेकरुला मानसिक धैर्य आले. संताचे आशिर्वाद सोबत आहेत याची खात्री वाटली. आणि यात्रा कमी त्रासात झाली.

ज्योतिषाकडे गेले असता तोडगे ऐकण्याची अनेकांची ईच्छा असते. त्याशिवाय लोकांना चैन नसते. चार महिन्याने दिवस बदलतील असे म्हटले तर समाधान होत नाही. सोळा सोमवार करा, दिवस बदलतील, भाग्य उजळेल हा उपाय मात्र भारी वाटतो. रत्न, खडे, गंडे हे सुद्धा असेच प्लासिबो आहेत की काय असे मला वाटते.

प्लासिबो हा वैद्यकशास्त्रीय शब्द असला तरी संकल्पना म्हणून मी तो इतरत्र वापरुन पाहिला. तुम्हाला दिसलेले प्लासिबो सुद्धा येथे लिहा.


हा लेख मिसळपाव या संकेतस्थळावर इथे सुद्धा वाचता येईल.

Saturday, December 20, 2008

शब्दांबरोबरचा रम्य प्रवास (उत्तरार्ध)

नमस्कार मंडळी,

माझ्या या शब्दांबरोबरच्या प्रवासात मला अनेक सुंदर जागा मिळाल्या. अशा की जेथे परत परत यावे आणि निवांत थांबावे.

यात पहिल्यांदा शब्द येतात बडबड गीतांतले. ते शब्द मला बालवयातल्या आठवणी म्हणूनच आवडतात असे नसून, ते नादमय आणि उच्चारायला सोपे म्हणून मला आवडतात. त्यातला वाळा, तोडे, चांदोबा, गडु, अडगुलं, मडगुलं हे शब्द कसे सुरेख आहेत पाहा. कुठेही क्लिष्टता नाही की उच्चारताना लय बिघडत नाही. त्यातच गडगड, पळ, हळूहळू अशी सोपी क्रियापदेही आपली वर्णी योग्यच लावतात.

ळ, ट, ड, ठ ही अक्षरे असलेले शब्द मला अनेकदा खास मराठमोळे वाटतात. जसे वळण, दळण, बाळबोध, दणकट, दांडगट आणि असे अनेक. भाषा शास्त्रीय दृष्टिकोनातून यांचा उगम वगैरे मला माहीत नाही. पण हे अगदी या काळ्या मातीतले, दगडा धोंड्यातले शब्द वाटतात. ते ओबडधोबड भले असतील पण त्यांना इथल्या रांगड्या भूरूपासारखा घाट आहे असे मला वाटते. बंगाली माणूस म्हणेल, 'तुमी कोथाय?' आणि मराठी माणूस म्हणेल, 'तू कुठे आहेस?' त्यात ठ, ह, स कसे ठासून म्हटले आहे पाहा. आपली भाषा मला म्हणूनच या भूमीशी नातं सांगणारी वाटते. साडेसहा कोटी वर्षे छातीचा कोट करून उभ्या असलेल्या सह्याद्रीची ती बहीण शोभेल खास !

या वाटेवरच आणि याच वळणाने रामदासांची शब्दयोजना मला भूल पाडते. पाहा, या दऱ्याखोऱ्यात घुमतील असे, विस्तीर्ण माळ व्यापतील असेच शब्द त्यांनी वापरले.
'गिरीचे मस्तकी गंगा, तेथून चालली बळे,
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे'
जशी भूमी राकट तसेच शब्दही. त्यांचे शब्द मला खास दणकट आणि खणखणीत वाटतात. 'मनाची शते' मोठ्याने म्हणताना आनंद वाटतो.

'शब्दांच्या पलीकडे' असा एक कार्यक्रम अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर लागत असे. तेव्हा या शीर्षकाने मला फार आकर्षीत केले होते. त्या कार्यक्रमात काय चाले ते समजायचे वय नव्हते त्यामुळे ते आता आठवत ही नाही. पण या कल्पनेने माझ्या मनात घर केले. 'शब्द' हा प्रकार काय आहे आणि त्या पलीकडे काय असते असा विचार चालू झाला आणि चालूच आहे. शब्द हा उच्चार सुद्धा बारीक स्फोटासारखा आहे. मग हे येतात कुठून आणि ते जेथून येतात त्याच ठिकाणाला 'शब्दांच्या पलीकडे' म्हणतात का? मग अनेक वर्षांनंतर, ज्या गाण्यातून ही कल्पना आली आहे ते पाडगावकरांचे गाणे ऐकले. अभिषेकीबुवा 'शब्द' असा उच्चार सुद्धा काय सुंदर करतात ! आणि ते वाक्य आले की ' शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पालीकडले'. आ हा हा! ज्या ठिकाणाचा मी विचार करीत होतो त्याच ठिकाणाचा पत्ता पाडगावकरांनी दिला. आपण म्हणतो की विचारांचे स्थूल रूप म्हणजे शब्द पण या ओळी ऐकताच मी समजलो की जाणीवेची अभिव्यक्ती म्हणजे शब्द.

मला वाटत होते की दोन जीवांमधील तारा म्हणजे शब्द. दोन मुक्कामांना जोडणारे रूळ म्हणजे शब्द. ज्ञानदेव म्हणतात 'शब्देवीण संवादु'. शब्द नसतील तरी संवाद होतो तर! आता समजले की, त्या रुळांवरून धावणाऱ्या आगगाडीतले प्रवासी म्हणजे शब्द. ते ही माझ्यासारखेच प्रवासी आहेत. पुढे जाणारे, जडण-घडण पावणारे आहेत. बदल पावणारे प्रगल्भ होत जाणारे आहेत. भाषेच्या प्रवाहात वाहत जाणारे आणि सुंदर घाट प्राप्त करणारे माझे सहचर आहेत.

शब्दांबरोबरचा रम्य प्रवास (पूर्वार्ध)

नमस्कार मंडळी,

परवाच 'नक्षत्रांचे देणे -शांता शेळके' या कार्यक्रमाची तबकडी पाहत होतो. त्यात त्या म्हणतात की त्यांचा प्रवास शब्दांपासून चालू झाला. अर्थापासून शब्दाकडे नाही तर शब्दाकडून अर्थाकडे असा. हे ऐकून मला वाटले की माझे सुद्धा बऱ्याच प्रमाणात असेच घडले. कधी लहानपणी 'राजा शिवछत्रपती' मध्ये मेघडंबरी हा शब्द वाचून मी फारच भारावला गेलो होतो. मग 'शब्दरत्नाकरात' त्याचा अर्थ पाहून अधिकच आनंद झाला आणि तो शब्द मनात ठसला.

शब्दांच्या बरोबरचा हा प्रवास मोठा रंजक आहे. शब्द कायमच मला मोह घालतात. प्रथम पासूनच मला ध्वनीवरून आलेले शब्द फार आवडतात. ते अतिशय नादमधुर असतात असे मला वाटते. पक्ष्यांची 'किलबिल' असो, वा हंसांचा कलरव. खरोखरच जेव्हा अनेक पाणपक्षी एकदम आकाशात उडतात ना, तेव्हा मी हा 'कलकल' आवाज ऐकला आहे. पोरे शाळेमध्ये करतात तो 'कोलाहल' सुद्धा कधी शाळेत उशीरा पोहोचलो की ऐकायला मिळाला आहे. तळजाईच्या डोंगरावर मी जेव्हा मोराची केका प्रथम ऐकली तेव्हा याला केकावली म्हणतात हे कोणी आठवण करून द्यायची गरज राहिली नव्हती. सिंहगडावर जेंव्हा प्रथम घुबडाचा घुत्कार ऐकला तेंव्हा सुद्धा, अगदी पहाटे सडेतीनच्या गाढ झोपेमध्ये, मला 'घुत्कार' हा शब्द आठवला आणि या आवाजाचे शब्दाशी असलेल्या साधर्म्याचे फार नवल वाटले.

रारंगढांग या विचित्र पण लयबद्ध शब्दाने माझ्यावर अशीच जादू केली. प्रभाकर पेंढारकरांच्या या पुस्तकाचे नाव मित्राने सांगताच ते पुस्तक वाचण्याची फार इच्छा झाली. आणि त्याहून कळस म्हणजे त्या पुस्तकाच्या सुरुवातीचे वाक्य!, 'खाली सतलज ध्रोंकार करत वाहत होती.' तो 'ध्रोंकार' हा शब्द असा घुसला की काय सांगू. हिमालयात भरपूर पाणी आणि तीव्र उतार यामुळे अतिवेगात वाहणाऱ्या, मोठमोठ्या शीळांवरून दमदारपणे जाताना त्यांचा चूर करणाऱ्या आणि भूरूप बदलवून टाकण्याची ताकत नदीत कशी वसते त्याचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या अशा मंदाकिनी, रावी, भिलंगणा अशा नद्यांचा मी अनुभवलेला तो भयप्रद आवाज, या शब्दात कसा पूर्णपणे सामावलाय !

लहानपणी दिवाळीचा किल्ला करत असू. आम्ही मोठमोठ्या दगडांचा डोंगर रचित असू आणि मग चिखल तयार करून, पाच दहा फुटांवरून त्याचे गोळे त्या दगडांवर मारत असू. कधी तो गोळा आपटून फुटे तर कधी गप्पकन पोक काढून तसाच बसे. पण कधी पाण्याचे योग्य प्रमाण असलेला गोळा असा काही योग्य तऱ्हेने जागेवर बसे की मला 'चपखल' शब्दाचीच आठवण होई.

काही शब्द तर पाहा काय सुंदर असतात. मेजवानी. हा मराठीत रुळलेला शब्द कसा खानदानी आहे पाहा. मेजवान, त्याने दिलेली मेजवानी. वाहवा. अगदी घरात जाऊन बसल्यावर लावलेल्या अत्तर, गुलाबपाण्यापासून, श्रीखंडाच्या जेवणानंतरच्या मुखशुद्धी पर्यंत त्यात सर्व काही आहे. आणि शब्दाचा डौल तर काय विचारावा.

द. ग. गोडश्यांची पुस्तके वाचताना जुन्या ऐकलेल्या अशाच काही शब्दांतील जादू समजली. त्यांनी वापरलेले पोत, वाक्-वळणे, आकार आणि घाट हे चार शब्द मुख्यत्वे माझ्यासमोर वेगळेच रूप घेऊन उभे राहिले. आकार हाच शब्द घ्या ना! त्या एका शब्दातून मुक्त अवकाशात, पार्थिव असे काही, रूप घेऊन उभे राहते. आणि त्यापुढे जाऊन त्या आकाराला असलेला घाट ! व्वा वा. 'घाट' हा लहानसा वाटणारा शब्द तर काय जबरदस्त प्रभावी आणि अभिव्यक्तिपूर्ण आहे. निरनिराळ्या आकाराची भांडी, वस्तू, वाहणाऱ्या नद्या, सह्याद्रीतील भूरूपे, कडे, सुळके, यांना प्राप्त झालेले आकार आणि त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण असे घाट. यातूनच मला लोकांच्या स्वभावाचे, त्यांच्या भाषेचे, वागणुकीचे घाट दिसू लागले. आणि आनंद होत राहिला. माझ्या पाहण्याला नवा आयाम मिळाला.

तर मंडळी, लाहनपणापासून आजपर्यंत हे शब्द मला वेळोवेळी असे चकित करत, भुलवत, मोह पाडत आले आहेत. असे वगवेगळे शब्द आसपास कोणी नसताना मोठ्याने उच्चारण्यात सुद्धा फार मौज असते. अशाच वेळी अनेकदा एखाद्या शब्दाचा स्वभाव आपल्याला कळून जातो. तो शब्द कसा आणि कोठे वापरला तर 'चपखल' बसेल ते समजते. शब्दांसोबतचा हा प्रवास फारच सुखावह आहे. आपला सर्वांचा शब्दांबरोबरचा प्रवास असाच काहीसा रम्य असेल, होय ना!