शब्दांबरोबरचा रम्य प्रवास (पूर्वार्ध)
नमस्कार मंडळी,
परवाच 'नक्षत्रांचे देणे -शांता शेळके' या कार्यक्रमाची तबकडी पाहत होतो. त्यात त्या म्हणतात की त्यांचा प्रवास शब्दांपासून चालू झाला. अर्थापासून शब्दाकडे नाही तर शब्दाकडून अर्थाकडे असा. हे ऐकून मला वाटले की माझे सुद्धा बऱ्याच प्रमाणात असेच घडले. कधी लहानपणी 'राजा शिवछत्रपती' मध्ये मेघडंबरी हा शब्द वाचून मी फारच भारावला गेलो होतो. मग 'शब्दरत्नाकरात' त्याचा अर्थ पाहून अधिकच आनंद झाला आणि तो शब्द मनात ठसला.
शब्दांच्या बरोबरचा हा प्रवास मोठा रंजक आहे. शब्द कायमच मला मोह घालतात. प्रथम पासूनच मला ध्वनीवरून आलेले शब्द फार आवडतात. ते अतिशय नादमधुर असतात असे मला वाटते. पक्ष्यांची 'किलबिल' असो, वा हंसांचा कलरव. खरोखरच जेव्हा अनेक पाणपक्षी एकदम आकाशात उडतात ना, तेव्हा मी हा 'कलकल' आवाज ऐकला आहे. पोरे शाळेमध्ये करतात तो 'कोलाहल' सुद्धा कधी शाळेत उशीरा पोहोचलो की ऐकायला मिळाला आहे. तळजाईच्या डोंगरावर मी जेव्हा मोराची केका प्रथम ऐकली तेव्हा याला केकावली म्हणतात हे कोणी आठवण करून द्यायची गरज राहिली नव्हती. सिंहगडावर जेंव्हा प्रथम घुबडाचा घुत्कार ऐकला तेंव्हा सुद्धा, अगदी पहाटे सडेतीनच्या गाढ झोपेमध्ये, मला 'घुत्कार' हा शब्द आठवला आणि या आवाजाचे शब्दाशी असलेल्या साधर्म्याचे फार नवल वाटले.
रारंगढांग या विचित्र पण लयबद्ध शब्दाने माझ्यावर अशीच जादू केली. प्रभाकर पेंढारकरांच्या या पुस्तकाचे नाव मित्राने सांगताच ते पुस्तक वाचण्याची फार इच्छा झाली. आणि त्याहून कळस म्हणजे त्या पुस्तकाच्या सुरुवातीचे वाक्य!, 'खाली सतलज ध्रोंकार करत वाहत होती.' तो 'ध्रोंकार' हा शब्द असा घुसला की काय सांगू. हिमालयात भरपूर पाणी आणि तीव्र उतार यामुळे अतिवेगात वाहणाऱ्या, मोठमोठ्या शीळांवरून दमदारपणे जाताना त्यांचा चूर करणाऱ्या आणि भूरूप बदलवून टाकण्याची ताकत नदीत कशी वसते त्याचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या अशा मंदाकिनी, रावी, भिलंगणा अशा नद्यांचा मी अनुभवलेला तो भयप्रद आवाज, या शब्दात कसा पूर्णपणे सामावलाय !
लहानपणी दिवाळीचा किल्ला करत असू. आम्ही मोठमोठ्या दगडांचा डोंगर रचित असू आणि मग चिखल तयार करून, पाच दहा फुटांवरून त्याचे गोळे त्या दगडांवर मारत असू. कधी तो गोळा आपटून फुटे तर कधी गप्पकन पोक काढून तसाच बसे. पण कधी पाण्याचे योग्य प्रमाण असलेला गोळा असा काही योग्य तऱ्हेने जागेवर बसे की मला 'चपखल' शब्दाचीच आठवण होई.
काही शब्द तर पाहा काय सुंदर असतात. मेजवानी. हा मराठीत रुळलेला शब्द कसा खानदानी आहे पाहा. मेजवान, त्याने दिलेली मेजवानी. वाहवा. अगदी घरात जाऊन बसल्यावर लावलेल्या अत्तर, गुलाबपाण्यापासून, श्रीखंडाच्या जेवणानंतरच्या मुखशुद्धी पर्यंत त्यात सर्व काही आहे. आणि शब्दाचा डौल तर काय विचारावा.
द. ग. गोडश्यांची पुस्तके वाचताना जुन्या ऐकलेल्या अशाच काही शब्दांतील जादू समजली. त्यांनी वापरलेले पोत, वाक्-वळणे, आकार आणि घाट हे चार शब्द मुख्यत्वे माझ्यासमोर वेगळेच रूप घेऊन उभे राहिले. आकार हाच शब्द घ्या ना! त्या एका शब्दातून मुक्त अवकाशात, पार्थिव असे काही, रूप घेऊन उभे राहते. आणि त्यापुढे जाऊन त्या आकाराला असलेला घाट ! व्वा वा. 'घाट' हा लहानसा वाटणारा शब्द तर काय जबरदस्त प्रभावी आणि अभिव्यक्तिपूर्ण आहे. निरनिराळ्या आकाराची भांडी, वस्तू, वाहणाऱ्या नद्या, सह्याद्रीतील भूरूपे, कडे, सुळके, यांना प्राप्त झालेले आकार आणि त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण असे घाट. यातूनच मला लोकांच्या स्वभावाचे, त्यांच्या भाषेचे, वागणुकीचे घाट दिसू लागले. आणि आनंद होत राहिला. माझ्या पाहण्याला नवा आयाम मिळाला.
तर मंडळी, लाहनपणापासून आजपर्यंत हे शब्द मला वेळोवेळी असे चकित करत, भुलवत, मोह पाडत आले आहेत. असे वगवेगळे शब्द आसपास कोणी नसताना मोठ्याने उच्चारण्यात सुद्धा फार मौज असते. अशाच वेळी अनेकदा एखाद्या शब्दाचा स्वभाव आपल्याला कळून जातो. तो शब्द कसा आणि कोठे वापरला तर 'चपखल' बसेल ते समजते. शब्दांसोबतचा हा प्रवास फारच सुखावह आहे. आपला सर्वांचा शब्दांबरोबरचा प्रवास असाच काहीसा रम्य असेल, होय ना!
मेघडंबरी हा शब्द चुकीचा आहे अस माझ मत आहे ...तो खरतर मेघडवरी असा आहे ... आपल्याकडे 'मेघडंबरी' ह्याबद्दल अधिक माहिती असेल तर कृपया पुरवावी ... !!!
ReplyDeleteरोहन,
ReplyDeleteलेख वाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद! मेघडंबरी हा शब्द मी पुस्तकात फार पूर्वी वाचला आणि लक्षात राहिला. पण त्याबद्दल मला अजून काही माहिती नाही.
--लिखाळ.