प्लासिबो - समाधान

प्लासिबो विषयी विचार करता मनात जे आले ते लिहित आहे. आपण अनेकदा प्लासिबो हा शब्द ऐकला आहे. वैद्यकशास्त्रात रुग्णाला औषधी गुणधर्म असलेला पदार्थ न देता जेव्हा औषध नसलेला पदार्थ त्याचे समाधान व्हावे म्हणुन देतात तेव्हा त्याला प्लासिबो म्हणतात. रुग्णाचे समाधान करणे हाच त्याचा हेतू असतो आणि बरे होण्याची मनात इच्छा असलेला रुग्ण ते 'फसवे औषध' घेउन बरा सुद्धा होत असतो.

माझी आजी म्हातारपणाने थकली होती. तिला सारखे काहीतरी होत आहे असे वाटून डॉरक्टकडे जायचे असायचे. मग अनेकदा आमचे नेहमीचे डॉक्टर गंभीर चेहर्‍याने तिला कोणत्यातरी साध्या गोळ्या देत आणि 'जास्त त्रास झाला तर दवाखान्यात भरतीकरुन सलाईन लावावे लागेल' असे सांगत. मग पुढे काही दिवस तिला एकदम बरे असे आणि डॉक्टर किती हुषार आहेत ते आम्ही ऐकत असू ! खरेतर प्लासिबो प्रकार माहित नसताना सुद्धा आपण अनेकदा तो वापरत असतो. लहान मुल पडले तर त्याला 'आला मंतर कोला मंतर, कोल्ह्याची आई कांदे खाई, बाळाचा बाऊ उडुन जाई ।' हा मंत्र घालून त्याला बरे वाटते.

शब्द सूक्ष्म असतात. शब्दापेक्षा कृतीवर किंवा वस्तूवर आपला जास्त विश्वास बसतो. नुसते लग्न झाले असे म्हणालो तर मनावर ठसत नाही. आंगठ्यांची देवाण घेवाण, मंगळसूत्र, वरमाला यामुळे मनावर ते ठसते. देवाला नुसता नमस्कार करुन भागत नाही. अंगारा लावला, प्रसाद खाल्ला की मनावर देवाच्या दर्शनाचा संस्कार ठसतो. मला वाटते की कृती अथवा स्थूलावरचा विषास हेच प्लासिबोचे तत्व आहे.

मागे एकदा एका संताच्या चरित्रात एक प्रसंग वाचला होता. कुणालातरी बरे नाही म्हणून एक माणूस औषध मागण्यासाठी त्या संताकडे येतो. संत म्हणतो की वाटेल बरे त्यांना. पण आलेला मनुष्य नुसताच उभा राहतो. मग तो संत शेजारच्या दिव्यातल्या तेलाचे चार थेंब हातावर देतो आणि सांगतो की हे आजार्‍याच्या तोंडात सोडा त्यांना बरे वाटेल. तो मनुष्य समाधानाने परततो. हे स्थूल वस्तूचे महात्म्य. एका मराठी संताच्या चरित्रात अशीच एक घटना आहे. कुणी व्यक्ती काशी यात्रेला निघते आणि त्यांना मुळव्याधीचा बराच त्रास होऊ लागतो. ती व्यक्ती या संताला म्हणते की यात्रा संपेपर्यंत तरी काही उपाय करा. यावर तो संत शेजारच्या तुळशीची चार पाने देउन ती वस्त्राला बांधून ठेवा असे सांगतो. पुढे काशी यात्रेत त्या व्यक्तीला फारसा त्रास होत नाही. याबद्दल त्या संताला विचारता तो म्हणतो 'अहो, सूर्याचे पिल्लू ते झाकून किती लपणार !'. पहा पण नुसती पाने जवळ ठेवण्याने त्या यात्रेकरुला मानसिक धैर्य आले. संताचे आशिर्वाद सोबत आहेत याची खात्री वाटली. आणि यात्रा कमी त्रासात झाली.

ज्योतिषाकडे गेले असता तोडगे ऐकण्याची अनेकांची ईच्छा असते. त्याशिवाय लोकांना चैन नसते. चार महिन्याने दिवस बदलतील असे म्हटले तर समाधान होत नाही. सोळा सोमवार करा, दिवस बदलतील, भाग्य उजळेल हा उपाय मात्र भारी वाटतो. रत्न, खडे, गंडे हे सुद्धा असेच प्लासिबो आहेत की काय असे मला वाटते.

प्लासिबो हा वैद्यकशास्त्रीय शब्द असला तरी संकल्पना म्हणून मी तो इतरत्र वापरुन पाहिला. तुम्हाला दिसलेले प्लासिबो सुद्धा येथे लिहा.


हा लेख मिसळपाव या संकेतस्थळावर इथे सुद्धा वाचता येईल.

Comments

  1. श्री.लिखळ, नमस्कार, उत्तम सुरवात. विषय व आपले विचार उत्तम. असेच झकास विषयांवर लेखन करा त्त्यामुळे आम्हांस वाचनखाद्य मिळेल. खुपखुप शुभेच्छा !

    T.Shreekant

    ReplyDelete
  2. फारच मस्त लेखन झालय अजुन येवुद्यात !

    मन्या

    ReplyDelete
  3. chaan liheele aahet.yaavarun aathavaN jhaalee, lahaanpaNee pareekshelaa jaataanaa, aamachaa aaijavaL hatt ase, aai, pepar sopaa jaail ase ekadaataree mhaN, tine tase mhatale kee dheer yeun pepar kharech sopaa jaat ase an tee tase mhaNaNyaapoorvee chhaanpaikee aadhevedhe pan ghet ase...kind of placebo ch jhaale naa ho he ? maumaau

    ReplyDelete
  4. श्री. श्रीकांत आणि मन्या,
    अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

    मऊमाउ,
    आपण सांगीतलेला अनुभव छान आहे. आईने दिलेला धीर खरेच काम करत असणार यात शंका नाही.
    प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

शब्दांबरोबरचा रम्य प्रवास (पूर्वार्ध)