शब्दांबरोबरचा रम्य प्रवास (उत्तरार्ध)

नमस्कार मंडळी,

माझ्या या शब्दांबरोबरच्या प्रवासात मला अनेक सुंदर जागा मिळाल्या. अशा की जेथे परत परत यावे आणि निवांत थांबावे.

यात पहिल्यांदा शब्द येतात बडबड गीतांतले. ते शब्द मला बालवयातल्या आठवणी म्हणूनच आवडतात असे नसून, ते नादमय आणि उच्चारायला सोपे म्हणून मला आवडतात. त्यातला वाळा, तोडे, चांदोबा, गडु, अडगुलं, मडगुलं हे शब्द कसे सुरेख आहेत पाहा. कुठेही क्लिष्टता नाही की उच्चारताना लय बिघडत नाही. त्यातच गडगड, पळ, हळूहळू अशी सोपी क्रियापदेही आपली वर्णी योग्यच लावतात.

ळ, ट, ड, ठ ही अक्षरे असलेले शब्द मला अनेकदा खास मराठमोळे वाटतात. जसे वळण, दळण, बाळबोध, दणकट, दांडगट आणि असे अनेक. भाषा शास्त्रीय दृष्टिकोनातून यांचा उगम वगैरे मला माहीत नाही. पण हे अगदी या काळ्या मातीतले, दगडा धोंड्यातले शब्द वाटतात. ते ओबडधोबड भले असतील पण त्यांना इथल्या रांगड्या भूरूपासारखा घाट आहे असे मला वाटते. बंगाली माणूस म्हणेल, 'तुमी कोथाय?' आणि मराठी माणूस म्हणेल, 'तू कुठे आहेस?' त्यात ठ, ह, स कसे ठासून म्हटले आहे पाहा. आपली भाषा मला म्हणूनच या भूमीशी नातं सांगणारी वाटते. साडेसहा कोटी वर्षे छातीचा कोट करून उभ्या असलेल्या सह्याद्रीची ती बहीण शोभेल खास !

या वाटेवरच आणि याच वळणाने रामदासांची शब्दयोजना मला भूल पाडते. पाहा, या दऱ्याखोऱ्यात घुमतील असे, विस्तीर्ण माळ व्यापतील असेच शब्द त्यांनी वापरले.
'गिरीचे मस्तकी गंगा, तेथून चालली बळे,
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे'
जशी भूमी राकट तसेच शब्दही. त्यांचे शब्द मला खास दणकट आणि खणखणीत वाटतात. 'मनाची शते' मोठ्याने म्हणताना आनंद वाटतो.

'शब्दांच्या पलीकडे' असा एक कार्यक्रम अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर लागत असे. तेव्हा या शीर्षकाने मला फार आकर्षीत केले होते. त्या कार्यक्रमात काय चाले ते समजायचे वय नव्हते त्यामुळे ते आता आठवत ही नाही. पण या कल्पनेने माझ्या मनात घर केले. 'शब्द' हा प्रकार काय आहे आणि त्या पलीकडे काय असते असा विचार चालू झाला आणि चालूच आहे. शब्द हा उच्चार सुद्धा बारीक स्फोटासारखा आहे. मग हे येतात कुठून आणि ते जेथून येतात त्याच ठिकाणाला 'शब्दांच्या पलीकडे' म्हणतात का? मग अनेक वर्षांनंतर, ज्या गाण्यातून ही कल्पना आली आहे ते पाडगावकरांचे गाणे ऐकले. अभिषेकीबुवा 'शब्द' असा उच्चार सुद्धा काय सुंदर करतात ! आणि ते वाक्य आले की ' शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पालीकडले'. आ हा हा! ज्या ठिकाणाचा मी विचार करीत होतो त्याच ठिकाणाचा पत्ता पाडगावकरांनी दिला. आपण म्हणतो की विचारांचे स्थूल रूप म्हणजे शब्द पण या ओळी ऐकताच मी समजलो की जाणीवेची अभिव्यक्ती म्हणजे शब्द.

मला वाटत होते की दोन जीवांमधील तारा म्हणजे शब्द. दोन मुक्कामांना जोडणारे रूळ म्हणजे शब्द. ज्ञानदेव म्हणतात 'शब्देवीण संवादु'. शब्द नसतील तरी संवाद होतो तर! आता समजले की, त्या रुळांवरून धावणाऱ्या आगगाडीतले प्रवासी म्हणजे शब्द. ते ही माझ्यासारखेच प्रवासी आहेत. पुढे जाणारे, जडण-घडण पावणारे आहेत. बदल पावणारे प्रगल्भ होत जाणारे आहेत. भाषेच्या प्रवाहात वाहत जाणारे आणि सुंदर घाट प्राप्त करणारे माझे सहचर आहेत.

Comments

  1. "आपली भाषा मला म्हणूनच या भूमीशी नातं सांगणारी वाटते. साडेसहा कोटी वर्षे छातीचा कोट करून उभ्या असलेल्या सह्याद्रीची ती बहीण शोभेल खास" लिखाळ भाउ खास उपमा आहे. फारच आवडली.लेख आवडला.

    ReplyDelete
  2. नमस्कार,
    प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
    --लिखाळ.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

मेजवानी आणि अनुवादित पुस्तके